Wednesday, June 25, 2014

पतौडी

आई तुला न  दिसणारे मित्र मैत्रिणी आहेत?
न दिसणारे?
हो! म्हणजे फक्त तुलाच दिसतील  असे?
नाही गं! तुझा आहे असा मित्र?
हो!
अरे व्वा! काय नाव त्याचं? आणि काय करतो तो?
त्याचं नाव ना, पतौडी! आणि तो असं एकच काम नाही करत. तो माझ्यापेक्षा खूप मोठा आहे. तुझ्यापेक्षा पण मोठा आहे.
अरे? मग तुम्ही काय खेळता?  त्याला तर तुझ्या खेळांत काहीच रस नसेल.
नाही काही! आहे ना. म्हणूनच तो माझा मित्र झालाय. कधी कधी तो कुल्फीवाला बनून येतो. असा मोठ्ठा झब्बा, पायजमा आणि टोपी घालून. त्याच्या डोक्यावर किनई एक मोठ्ठी पेटी असते. आणि त्या पेटीच्या आणि त्याच्या डोक्याच्यामध्ये ना, एक कापडाची उशी असते.
हा हा! उशी नाही राणी, त्याला चुंबळ म्हणतात.
तेच ते. मग ना तो आधी पेटी खाली ठेवतो. मी त्याला पाणी आणून देते. मग तो मला त्याच्या पेटीतून कुल्फी  काढून देतो. आणि मी त्याला पैसे देते.
कुठले पैसे?
आमचे पैसे. ते  तुम्हाला दिसत नाहीत! कधी कधी तो आणि मी चिखलाची भांडी बनवतो. एकदा अशी भांडी बनवताना पतौडीचा चष्मा चिखलात पडला होता. काय हसलो होतो तेव्हा आम्ही!
तो दिसायला कसा आहे गं?
म्म, असा उंच आहे. त्याचं नाक खूप मोठं आहे. गरुडाच्या चोचीसारखं. आणि त्याला मिशी आहे. पण ती आता थोडी पांढरी झालीये. केस पण पांढरे झालेत त्याचे. बिच्चारा. आणि तो माझ्यासारखा जोरात पळू सुद्धा नाही शकत. मी झाडावर चढले की तो खाली बघत उभा राहतो.
मग तुला  तोच का आवडतो? तुझ्या वयाचा एखादा मित्र का नको?
कारण ना, तू जे करतेस ते सगळं तो करू शकतो. त्यानी नळ सोडून पाणी उडवलं तर त्याला कुणी रागवत नाही. आणि तो मला तुझ्यासारख्या गोष्टी पण सांगतो.
कुठल्या गं?
तू सांगतेस त्याच सगळ्या. फक्त तो दुपारी सांगतो आणि तू रात्री. आणि तू माझं सगळं कसा ऐकून घेतेस तस्संच तो पण ऐकतो. शाळेत सगळ्यांना बोलायचं असतं. त्यामुळे कुणीच कुणाचं ऐकत नाही. आणि शाळेत टीचरला सगळं नाही सांगता येत.
सगळं म्हणजे काय ठकूताई? अशी काय गुपितं आहेत आपली?
म्हणजे माझं जेव्हा रियाशी भांडण होतं तेव्हा मी टीचरला नाही सांगू शकत ना. तू पण माझं  नेहमी ऐकून घेत नाहीस. सारखी "अभ्यास कर, अभ्यास कर" म्हणतेस मला! मग पतौडी ऐकतो माझं!
अजून काय करतो हा पतौडी?
स्पोर्ट्स डे ला मी त्याला शाळेत घेऊन जाते. तो असला की मला टेन्शन येत नाही पळायचं. आणि जेव्हा तू मला माझे मोजे घडी घालून ठेवायला लावतेस ना कपाटात, तेव्हा मी त्याच्याशी गप्पा मारते. नाहीतर मला खूप कंटाळा येतो मोजे आवरायचा.
तू माझ्यासमोर बोल ना एकदा त्याच्याशी. मला ऐकायचंय.
पण तुला तो काय बोलतो ते ऐकू येणारच नाही! आणि असे मित्र शेअर नसतात करायचे. तू पण तुझा पतौडी शोध! तुलापण खूप छान वाटेल ऑफिसमधून आल्यावर त्याच्याशी बोलायला!

1 comment: